एका ऐतिहासिक घटनेला नुकतीच १२५ वर्षं पूर्ण झाली. तशी ती घटना ऐतिहासिक असली तरी एकमेवाद्वितीय वगैरे नाही. कारण आपल्यापैकी ९९.९९% लोकांनी अशा घटनेचा अनुभव तर घेतलेला आहेच आणि वरून आपली अक्कलहुशारी वापरून ग्लास फोडल्याचे बारा आणे भरायच्याऐवजी आठ आण्यात भागवल्याचे किस्सेही इतरांना सांगितलेले आहेत. ती गोष्ट म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला पकडून फाडलेली पावती. तर जगाच्या इतिहासात पहिली पावती फाटण्याच्या घटनेला २८ जानेवारी २०२२ ला १२५ वर्षं पूर्ण झाली. आणि हा सन्मान मिळवणारे मानाचे मानकरी आहेत Walter Arnold.
२८ जानेवारी १८९६ रोजी हे Walter Arnold साहेब ताशी ८ मैल (८×१.६ = १२ किमी/तास) अशा महाप्रचंड वेगाने इंग्लंडमधल्या Kent परगण्यातल्या Paddock wood नावाच्या शहरातल्या रस्त्यावरून आपली मोटार हाकत चाललेले होते. या रस्त्यावर मोटार चालवण्याचा कमाल वेग ताशी २ मैल इतकाच होता. Walter Arnold ला इतक्या वेगाने मोटार हाकताना पाहून तिथं कर्तव्य बजावणाऱ्या एका हवालदार साहेबांनी बघितलं आणि त्यांनी ताबडतोब यांवर कारवाई करण्याचा निश्चय केला. त्यांनी लागलीच आपल्या सायकलवर टांग टाकून त्याचा पाठलाग सुरू केला. हवालदार साहेबांनी कर्तव्यात मुळीच कसूर न करता Walter Arnold चा पाच मैल पाठलाग केला आणि अखेर त्याला गाठलं.
आणि Walter Arnold साहेबांवर खटला दाखल झाला. हा वेगळ्या प्रकारचा खटला निरनिराळ्या कलमांखाली एकूण ४ कोर्टात चालला आणि अखेर Walter Arnold यांना एकूण २ पौंड ११पेन्स इतका दंड ठोठावण्यात आला. या ऐतिहासिक घटनेला कारणीभूत ठरलेल्या Walter Arnold पेक्षाही मला कौतुक वाटलं ते त्या कर्तव्यकठोर हवालदार साहेबांचं. त्यांनी प्रकरण ‘मिटवून’ घेण्याचं कौशल्य न दाखवल्याने एका फार मोठ्या ऐतिहासिक घटनेची नोंद कागदोपत्री झाली.

Walter Arnold चालवत असलेली गाडी होती मर्सिडीज बेन्झ. Walter Arnold चा मोटारी विकण्याचा धंदा होता, तो जर्मनीतून मर्सिडीज गाड्या आणून इंग्लंडमध्ये विकत असे. पुढं त्यानं स्वतःची Arnold’s Motor Carriage नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. पण पुढच्या आयुष्यात Walter Arnold ला पुन्हा कधीही दंड भरायची वेळ आली नसावी कारण इंग्लंडमध्ये १८९६ च्या ऑगस्ट महिन्यात गाडी चालवण्याच्या वेगाची मर्यादा २ मैल प्रतितास वरून थेट ताशी १४ मैल करण्यात आली.

यशोधन जोशी
Leave a Reply