आपण लहान असताना आपल्या फटाके उडवण्यावर तसे कुठले निर्बंध नव्हते, आपण अगदी मुक्तपणे पाहिजे तेवढे फटाके उडवले. मी दिवाळीत फटाके उडवत असतानाच घरी आलेला एखादा नतद्रष्ट नातेवाईक (बहुतेक मामाच) घरच्यांच्या समोर ‘आत्ता फटाके उडवताय पण खरे फटाके शाळा सुरू झाल्यावर उडतीलच’ अशी शापवाणी उच्चारून जायचा. तरी मी फटाके उडवल्याशिवाय कधी राहिलो नाही (आणि पुढच्या गोष्टीही टळल्या नाहीत.)
आता दिवाळीत फटाके उडवण्यावर न्यायालयाने निर्बंध घातलेले असले तरी फटाक्यांवर लिहायला त्यांची काही हरकत नसावी त्यामुळे या दिवाळीला मी धांडोळ्यासाठी फटाक्यांच्यावरच लेख लिहून काढला.
इतर अनेक शोधांप्रमाणे फटाक्यांचा शोधही चीनमध्येच लागला, इस ६ व्या शतकात चीनच्या हुनान प्रांतात भुतांना किंवा आत्म्यांना पळवून लावण्यासाठी बांबूच्या पोकळ नळीत दारू भरून ती जाळली जाई. पण आवाजाचे फटाके अजून तयार झाले नव्हते. पण सातव्या शतकाच्या सुरुवातीलाच Suy वंशातला राजा Yang-ti च्या कारकिर्दीत वाजणारे फटाके निर्माण होऊ लागले.
पुढे दहाव्या शतकापर्यंत फटाक्यांच्या प्रांतात बरीच प्रगती होत गेली आणि अग्निबाण,सापासारखे जमिनीवरून फुत्कारत जाणारे फटाके, सुंsssई आवाज करत आभाळात जाणारे फटाके तयार होऊ लागले आणि याचबरोबर शोभेचे फटाकेही तयार झाले.
फटाके तयार करणे याला इंग्रजीमध्ये Pyrotechnics असं नाव आहे. यात अधिकाधिक प्राविण्य मिळवत दहाव्या शतकाच्या आसपास फटाके युद्धतंत्राचाही भाग बनले. स्फोटके भरलेले गोळे, बाण किंवा भाले युद्धात वापरले जाऊ लागले. पण फटाके तयार करण्याच्या तंत्राविषयीची आपण या लेखात चर्चा न करता त्यांच्या वापराविषयीचे इतिहासातील संदर्भ आपण पहाणार आहोत.
आत्तापर्यंतचे फटाक्यांचे सगळे संदर्भ चीनमधले आहेत आणि दिवाळी आली की चिनी मालावर बहिष्कार घालण्याची आपली परंपरा आहे म्हणून आपण आता फटाक्यांचे भारतातले काही संदर्भ आहेत काय ते शोधूया.
अब्दुर रझाक नावाचा एक राजदूत पर्शियन बादशहा शाह रुख याच्यातर्फे भारतात आलेला होता. त्याने विजयनगरला भेट दिली तेंव्हा दुसरा देवराया सत्तेवर होता. अब्दुर रझाकने त्यावेळी विजयनगरला बराच काळ मुक्काम ही ठोकला होता. त्याने विजयनगरच्याविषयीची माहिती आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवलेली आहे. महानवमीच्या उत्सवाचे (म्हणजे बहुदा खंडेनवमीचे) वर्णन करताना तो त्यावेळी उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीचे वर्णन करतो. हे वर्णन १४४३ सालातले आहे. (युरोपमधला आतषबाजीचा पहिला लिखित संदर्भ १५७० सालातला आहे, जो न्यूरेम्बर्ग येथील आतषबाजीचा आहे)
काश्मीरचा एक सुलतान झैनुल अबीदिन ज्याने १४२१ ते १४७२ च्या दरम्यान राज्य केले. या सुलतानाने फटाक्यांच्या निर्मितीविषयीची माहिती पर्शियन भाषेत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात लिहून काढलेली आहे. त्याच्याच राजवटीत १४६६ मध्ये काश्मीरमध्ये फटाक्यांचा पहिला संदर्भ आढळतो.
Verthema हा इटालिअन प्रवासी इस १५०२ ते १५०८ सालच्या दरम्यान भारतात आला होता, त्यानेही विजयनगरला भेट दिली होती. त्यावेळी त्याने हत्तींच्या झुंजीची वर्णने केली आहेत. कधीकधी झुंजीच्या दरम्यान हत्ती बेफाम होतात त्यावेळी फटाक्यांचा वापर करून त्यांना वेगळे करण्यात येई.
विजयनगरच्या राजाला फटाके उडवणे किंवा आतषबाजी करणे शक्य होते पण सामान्य प्रजेला फटाके उपलब्ध होते का असा प्रश्न तुम्हाला आता पडलेला असेलच तर त्याचंही उत्तर मी देणार आहे.
Verthema चाच समकालीन पोर्तुगीज प्रवासी Barbosa हा गुजरातमध्ये गेलेला होता त्यावेळी एका लग्नाच्या वरातीचे वर्णन करताना तो वरातीसमोर वाजवण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे आणि बाणांचे वर्णन करतो. यावरून फटाके (आजच्यासारखे) फार महाग नसून सामान्य जनतेला परवडावे अशा दरात उपलब्ध होते हे नक्की.
आज आपल्याला फटाक्यांचे प्रकार सांगा असं कुणी सांगितलं तर आपण बॉम्ब, झाडं/कुंड्या, चक्र वगैरे प्रकार सांगू पण त्यावेळेच्या भारतातली फटाक्यांची नावं बघितली तर ती नावं फारच सुंदर आहेत. कल्पवृक्षबाण, चामरबाण, चंद्रज्योति, चंपाबाण, पुष्पवर्ति, छुछुंदरीरसबाण, तीक्ष्णबाण, पुष्पबाण ही नावंच बघा किती काव्यात्मक आहेत. (नाहीतर लक्ष्मीतोटा, नाझी बॉम्ब, नागगोळी ही काय नावं आहेत?)
ही सगळी नावं एका संस्कृत ग्रंथातली आहेत, या ग्रंथाचं नाव आहे कौतुकचिंतामणी आणि त्याचा कर्ता आहे गजपती प्रतापरुद्रदेव. प्रतापरुद्रदेव हा १४९७ ते १५४० या काळात ओरिसावर राज्य करत होता. या ग्रंथात फक्त फटाक्यांची नावंच न सांगता ते तयार करण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे घटक यांचीही नावं दिलेली आहेत. गंधक म्हणजे सल्फर, यवक्षार म्हणजे Saltpetre, अंगार म्हणजे कोळसा अशा विविध रासायनिक पदार्थांची आणि वर्तिका म्हणजे वात, नालक म्हणजे बांबूचा पोकळ तुकडा, अन्नपिष्ट म्हणजे भाताची खळ अशा इतर घटकांचीही नावं दिलेली आहेत.
आता हे संदर्भ वाचून फटाके उडवण्यात ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ?’ असा प्रश्न जर कोणी उपस्थित केला, तर महाराष्ट्र या प्रांतातही त्याकाळी अग्रेसरच होता. महाराष्ट्रात आपल्या संत कवींनी फटाक्यांची वर्णनं करून ठेवलेली आहेत इतकंच नव्हे तर फटाक्यांची नावे वापरून काव्यात दृष्टांतही दिलेले आहेत.
सोळाव्या शतकातले महाराष्ट्रातले संत एकनाथ यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा एक ग्रंथ रचला त्यात आलेले आतषबाजीचे वर्णन फारच सुंदर आहे. Crackers या एकाच नावाने आपल्याला फटाके माहीत असतील तर फटाक्यांचे नामवैविध्य इथं तुम्हाला दिसेल.
एकनाथांनी वापरलेल्या त्या काळातल्या फटाक्यांची आजची नावे काय आहेत याचा आपण अंदाज करायचा प्रयत्न करूया. अर्थात त्यावेळचे या फटाक्यांचे रूप आणि आजचे रूप किंवा नावे यात फरक असणार हे निश्चित.
अग्नियंत्र – रॉकेट
हवई/हवाई – हवेत उडणारा फटाका
सुमनमाळा – झाड/कुंडी/अनार
चिचुंदरी – सुंsssई असा आवाज करत उडणारे रॉकेट याला सध्या सायरन असं म्हणतात
भुईनळा – हा सुद्धा झाडाचाच प्रकार आहे
चंद्रज्योती – आज याला आपण स्काय शॉट म्हणतो
हातनळा/पुष्पवर्ती – फुलबाजा किंवा आपण ज्याला आज पेन्सिल म्हणतो.
एकनाथांच्या नंतर महाराष्ट्रातले अजून एक महत्वाचे संत म्हणजे रामदास, त्यांच्या काव्यातही आतषबाजीचे उल्लेख येतात. मंदिरातले भजन संपल्यावर होणाऱ्या दारुकामाचे वर्णन करताना रामदास लिहितात –
दिवट्या हिलाल चंद्रजोती
बाण हवया झळकती
नळे चिचुंद्रया धावती | चंचळत्वे ||
फुलबाजा बंदुका खजिने |
पट्टे दांड भेदिती बाणे
अभिनव कीर्ती वाखाणे | भाट गर्जती ||
असेच वर्णन रामदास चाफळच्या मंदिरातील उत्सवाचेही करतात
दिवट्या हिलाल चंद्रजोती
नळे आरडत उठती
बाण हवाया झरकती | गगनामध्ये ||
मराठ्यांनी पेशवाईत नर्मदा ओलांडून उत्तरेकडे जो काही राज्यविस्तार केला त्यावेळी त्यांना उत्तरेतले वैभव आणि कला यांचा परिचय झाला. मग उत्तरेकडचे कलाकार बोलावून चित्रं काढून घेणं असो किंवा उत्तरेच्या धर्तीवर मोठंमोठे वाडे बांधणे असो यांची सुरुवात त्याकाळात झाली. पेशवाईतलाच एक प्रसंग आहे, एकदा महादजी शिंदे आणि सवाई माधवराव बोलत असताना महादजी शिंदे सवाई माधवरावांना राजपुतान्यातल्या दिवाळीविषयी सांगत होते. कोट्याला राजेशाही दिवाळी साजरी करताना दारुचेच रावण, राक्षस, वानरे आणि हनुमान वगैरे तयार केले जात आणि मग शेपटीला आग लावलेला हनुमान उड्डाण करून लंकादहन करत असे. कोट्याचा राजा आणि तिथली प्रजा या आतषबाजीचा दरवर्षी आनंद लुटत.
या आतषबाजीची गोष्ट ऐकल्यावर सवाई माधवरावांनीही अशी “दारूची लंका” बघायची इच्छा व्यक्त केली. महादजी शिंद्यांनी मग सगळी तयारी करवून पर्वतीच्या पायथ्याला हा आतषबाजीचा कार्यक्रम करवला आणि बालपेशव्याने हा कार्यक्रम पर्वतीवरून बघितला.
पेशवाईमध्ये जे आतषबाजीचे प्रकार प्रसिद्ध होते त्यांची नावे होती – तावदानी रोषणाई, आकाशमंडळ तारांगण, चादरी दारुकाम, नारळी झाडे, प्रभाचमक, कैचीची झाडे, बादलगर्ज, बाण, पाणकोंबडी, हातनळे, कोठ्याचे नळे, फुलबाज्या, महताफा.
हे सगळे संदर्भ झाले भारतीय पद्धतीने केलेल्या आतषबाजीचे पण भारतावर ब्रिटिश राजवट सुरू होण्याच्या काही वर्षे आधी अवधचा नवाब असफउद्दौला याच्यासाठी ब्रिटिशांनीही एक आतषबाजीचा कार्यक्रम केला होता. लखनौच्या आसपास झालेली ही आतषबाजी अत्यंत कलापूर्ण होती. करॅर नावाच्या एका साहेबाने हे फटाके तयार केले होते. आधी हिरव्या, भगव्या आणि निळ्या रंगाची असंख्य प्रकाशफुले करॅर साहेबाने आकाशात उधळली. त्यापाठोपाठ आकाशात मासे पोहतानाचा नजारा दाखवला आणि त्यानंतर आकाशात चक्रे फिरवून आणि बाण उडवून आकाश उजळून टाकले. सगळ्यात शेवटी आतषबाजीतून एक मशीदही साकारली.
आतषबाजीची दारू किंवा बंदुकीची दारू तयार करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रात शिकलगार असं म्हटलं जाई. अजूनही महाराष्ट्रात जिथं जिथं संस्थांनी राजवट होती तिथं शिकलगार आडनावाचे लोक आढळतात. शिकलगार समाज अजूनही पारंपारिक पद्धतीने फटाके तयार करतो अर्थात शिवकाशीच्या फटाक्यांच्यासमोर त्यांच्या फटाक्यांचा आवाज आता दबून गेलेला आहे. मला मात्र अजूनही लग्नाच्या वरातीत आकाशात उंच जाणाऱ्या बाणातून नवरा-नवरीची नावं झळकवणारा कोल्हापूरचा एक शिकलगार लक्षात आहे.
कौतुकचिंतामणी या आपल्या ग्रंथात प्रतापरुद्रदेव आतषबाजीला ’विनोद’ असं संबोधतो किंबहुना त्याकाळात करमणुकीच्या सर्वच गोष्टींना विनोद असेच संबोधले जाई. या दिवाळीत तुम्हाला ’वाचन विनोदाचा’ पुरेपुर आनंद मिळो या शुभेच्छा !
यशोधन जोशी
संदर्भ –
१. डॉ. गोडे यांचा शोधनिबंध संग्रह
२. पेशवेकालीन महाराष्ट्र – भावे