कानामागून आली आणि….

अनेक गोष्टींविषयी आपल्या काही विविक्षित कल्पना असतात. उदाहरणार्थ  छत्रपती शिवाजी महाराजांच्यासोबत मोहिमेवर गेलेलं लष्कर दुपारच्यावेळी कुठं तरी रानात बसून लसूण घातलेला मिरचीचा झणझणीत ठेचा, मुठीनं फोडलेला कांदा आणि भाकरी अशी आपली शिदोरी खात बसलेलं आहे असा प्रसंग कुठल्या सिनेमात किंवा सिरीयलीत दाखवला तर आपण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू. पण खऱ्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मिरची खाल्ली असेल का ? याबद्दल आपल्याला ठाम विधान करता येणार नाही कारण मिरची भारतात महाराजांच्या जन्माआधी जेमतेम शतकभरच भारतात अवतरलेली होती. आणि कोणतीही नवीन खाण्याची गोष्ट आपल्या आहाराचा भाग होण्यासाठी बराच काळ लोटायला लागतो. 

ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये अशी आपल्याकडं एक म्हण आहे पण मिरचीचं कुळ शोधून काढायला काही हरकत नसावी. एखाद्या घरातली सगळी मंडळी सालस आणि गोड स्वभावाची असताना त्याच घरात एखादा तिरशिंगराव निघावा तसं वांगी, बटाटे आणि टोमॅटो यांच्या कुळात म्हणजे Solanaceae कुटुंबात जन्माला आलेली मिरची मात्र वेगळी आहे. याच कुळातला अजून एक वांड कुलदीपक म्हणजे आपले तंबाखूराव. या बहीणभावांनी तमाम मानवजातीला घाम फोडायचं काम अगदी इमानेइतबारे पार पाडलेलं आहे. यांच्याच लांबच्या नात्यातले पण माळकरी म्हणजे आपले रताळेबुवा. आता एवढयावर हा कुलपरिचय थांबवून आपण पुढं सरकूया.

जगभरात मिरचीच्या ४००हून जास्त जाती असल्या तरी मिरची ही मुळात अमेरिकन. Aztek आणि Mayan मंडळींना मिरची माहीत होती. कोकोच्या पाण्यात मिरचीच्या बिया मिसळून आणि त्यात इतर काही पदार्थ घातलेलं एक झटकेबाज पेय  ही मंडळी लैंगिकशक्तीच्या वाढीकरता पीत असत. असलं मिरचीच्या बिया घातलेलं झणझणीत पेय प्याल्यावर खरंच शक्तीत वाढ व्हायची का वारंवार उठाबशा काढायला लागून शक्तिपात व्हायचा हा अभ्यासाचा विषय आहे. पण सांगायचा उद्देश असा की या मंडळींचा मिरचीशी जुना घरोबा. मुळात chilli हा शब्दच आपण Aztek मंडळींच्या xilli या शब्दावरून घेतलेला आहे. मिरचीचेच एक थुलथुलीत वाण म्हणजे ढब्बू उर्फ सिमला मिरची. तिला मिळालेलं Capsicum हे नाव ग्रीक शब्द kapto म्हणजे to bite यावरून आलेलं आहे. अर्थात या bite ला पलीकडून तेवढंच जोरदार प्रत्युत्तर मिळतंय ही गोष्ट वेगळी.

लेकरांना शिक्षा म्हणून मिरच्यांची धुरी देणारे Aztec पालक

मिरचीची छोटी रोपं गादीवाफ्यात लावून त्याना तीन महिने न चुकता पाणी, खत घातल्यावर आणि फवारणी केल्यावर ती अदमासे अमुक तमुक फुटाची होऊन त्यांना त्यांच्या वाणाप्रमाणे हिरवी/लाल/जांभळ्या रंगाची आणि तुकतुकीत कांतीची फळे धरतात – अशा शेतकरी बंधूंच्या कार्यक्रमातल्या माहितीऐवजी आपण मिरची तिखट का लागती याकडे आपण वळूया.

मिरचीत Capsaicin नावाचे एक रासायनिक द्रव्य असते जे खाल्ल्याने किंवा संपर्कात आल्यानेही सस्तन जीवांच्या शरीराचा दाह होतो. कॉलेजात शिकलेली केमिस्ट्री थोडी आठवत असेल तर Capsaicin फॉर्म्युला आहे C18H27NO3. Capsaicin च्या ग्रंथी मिरचीच्या आतल्या बाजूला जो पांढऱ्या रंगाचा भाग असतो ज्याला मिरचीच्या बिया चिकटलेल्या असतात त्या जागी असतात. म्हणजे आपली जी समजूत आहे की बिया काढून टाकल्या की मिरचीचा तिखटपणा कमी होतो ती मुळातच चुकीची आहे. Capsaicin च्या मुळाशी जाऊन त्याचा शोध लावला तो अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ Albert Brown Lyons ने.

Albert Brown Lyons

आता सगळ्याच मिरच्यांत Capsaicin च असलं तरीही ‘जगात भारी’ Capsaicin कुठल्या मिरचीत असा प्रश्न लगेच तुम्हाला पडलाच असेलच. पण त्याआधी Capsaicin ची तिखट मर्यादा कशी मोजतात हे आपण जरा समजून घेऊया. तिखट मोजण्याचं आपल्याकडचे परिमाण जरी ‘आज आत्ता ताबडतोब’ ते ‘दुसऱ्या दिवसाची सकाळ’ असं असलं तरी त्याचं शास्त्रीय परिमाण आहे ते म्हणजे SHU. SHU म्हणजे Scoville Heat Units. प्रोफेसर Scoville नावाच्या एका संशोधकाने ही पद्धत शोधली म्हणून या पद्धतीला त्याचे नाव देण्यात आले.

Wilbur Scoville

तिखटपणा मोजण्याची पद्धत समजून घेणं तिखट पचवण्यापेक्षा सोपं आहे. आजकाल सगळ्या उगीचच विदेशी नावं दिलेल्या (आणि महाग) हॉटेलात jalapeños नावाची मेक्सिकन मिरची सगळ्यात घातलेली आढळते तिची Scoville scale आहे 4,000 ते 8,500 SHU. म्हणजे हिचा तिखटपणा पुर्णतः घालवायला साधारणपणे ४५०० ते ८००० साखर आणि पाण्याच्या द्रावणाचे थेंब लागतात. भारताच्या ईशान्येकडे म्हणजे आसाम, मणिपूर आणि नागालँडमध्ये पिकणारी Bhut jolokia नावाची मिरची जगातली सगळ्यात तिखट मिरची आहे. जिची Scoville scale आहे 8,00,000 SHU तर शुद्ध Capsaicin ची Scoville scale आहे 1,60,00,000 SHU. हे सगळे आकडे ऐकूनच आपल्या कानातून जाळ निघायला लागलाय पण हे सगळे SHU चे आकडे निश्चित करण्यासाठी या चाचण्या वारंवार केल्या गेल्या त्या प्रत्येकवेळी मिरचीची पूड चाखून बघूनच. साधारण १९१२च्या सुमारास.

मिरचीचा तिखटपणा मोठ्या प्रमाणात तिच्या कामीसुद्धा आलेला आहे. कारण Capsaicinoids मुळं मिरचीवर सूक्ष्मजीव वाढत नाहीत तिच्यावर बुरशीदेखील धरत नाही. त्यामुळे उष्ण कटिबंधात रहाणाऱ्या मानवाने तिचा वापर आहारात करण्याआधी मांस टिकवण्याच्या दृष्टीने केला असावा. आजही जेंव्हा आपण मिरची घातलेले जे मांसाहारी पदार्थ खातो त्यात मिरची चव आणण्यासोबतच मांसातले सूक्ष्मजीव नष्ट करण्याचं काम पण करत असते.

अमेरिका खंडातली मूळ रहिवासी मंडळी मिरचीचा पुरेपूर वापर करत त्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी म्हटल्याप्रमाणे कचऱ्याचे खड्डे, चुलीच्या आसपास, भांड्यात सर्वत्र आपल्याला मिरचीचे अवशेष सापडतात. आपण आधी बघितल्याप्रमाणे चॉकलेटमध्ये मिरची मिसळून पेयं तयार केली जातच पण त्याच बरोबर maize gruel म्हणजे मक्याच्या लापशीसारख्या पदार्थातही मिरची घालून त्याची चव वाढवली जाई. मृतांना आणि देवांना मिरचीचे पदार्थ तर्पण/अर्पण केले जात.

स्पॅनिश मंडळी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिका खंडाच्या जाऊन पोचली आणि लौकरच त्यांना मिरचीची ओळख झाली. चवीसाठी सगळा युरोप मिरीवर अवलंबून असताना लागलेला हा शोध म्हणजे अफाटच होता. स्पॅनिश मंडळींना अमेरिका खंडावर ताबा काही सहज मिळाला नाही त्यांनी अफाट लढवय्येपणा आणि अर्थातच क्रूरताही दाखवून ते साध्य करून दाखवलं. या भांडणात काहीवेळा स्पॅनिश मंडळी आणि मूलनिवासी मंडळींचे म्होरके एकमेकांच्या हाती लागत. मग अशावेळी रक्तपात करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात मिरच्यांच्या खंडणीची देवाणघेवाण करून प्रश्न सोडवला जाई. स्पॅनिश मंडळींनी स्वतःबरोबर मिरची स्वदेशी आणली आणि ती तिथं इतकी प्रसिद्धीला आली की १५व्या शतकातल्या  स्पेनमध्ये खाद्यपदार्थात सढळ हाताने मिरची वापरणं हे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जायचं. (या श्रीमंतीचे दुष्परिणामही जाणवले असतीलच म्हणा)

युरोपमध्ये मिरची येऊन पोचल्यावर तिच्यावर अनेक प्रयोग केले जाऊ लागले, तिची वेगवेगळी वाणं तयार करण्यात येऊ लागली. त्याआधी मिरचीच्या जन्मस्थानी म्हणजे अमेरिका खंडातल्या आदिवासी म्हणवल्या जाणाऱ्या मंडळींनीही मिरचीवर शेकडो वर्षे प्रयोग करत करत ठराविक रंगाच्या, आकाराच्या आणि तिखटपणाच्या वाणांची निर्मिती केलेलीच होती.

१४९३ मध्ये जेंव्हा कोलंबस दुसऱ्यांदा त्यानं शोधलेल्या नवीन भूभागात दाखल झाला त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की तिथली स्थानिक मंडळी त्यांच्या अन्नात तिखटपणासाठी काही वेगळा पदार्थ वापरतात तेंव्हा त्याने त्याचा सहाय्यक Diego Álvarez Chanca ला याची नोंद घ्यायला सांगून हे भाकीत केलं की या मिरच्या त्यांना मोठा फायदा मिळवून देऊ शकतात. त्यानं अंदाजाने हे ठरवलं की दरवर्षी साधारण २००-२५० टन मिरच्यातरी आपण इथून आपल्या देशात नेऊ शकू. पण कोलंबसने मिरच्यांना pepper हेच नाव दिलेलं होतं कारण तिखट म्हणजे pepper उर्फ आपली काळी मिरी हीच समजूत त्याकाळी रूढ होती. परत येताना नमुन्यादाखल त्याने मिरचीची रोपं आणि मिरच्या दोन्ही आपल्या सोबत स्पेनला आणले. तिथं पोचल्यावर मिशनरी मंडळींनी त्यांना रुजवलं, त्यांची रोपं तयार केली पण सुरुवातीचा काही काळ त्यांचा उपयोग शोभेची झाडं म्हणूनच झाला कारण त्यांना मिरचीत विष असावं असा संशय होता. पण लौकरच तो संशय मावळला आणि मिरची युरोपमध्ये प्रसिद्धीला आली. १५९७ साली मिरचीच्या बिया इंग्लंडला पोचल्याचा संदर्भ आपल्याला ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ John Gerard च्या लिखाणात सापडतो. पण इंग्लंडमधल्या थंड वातावरणात मिरचीचा लाल रंग काही खुलला नाही.

युरोपिअन दर्यावर्दी मंडळी म्हणजे  अगदी वास्को द गामा, कोलंबस आणि इतर मंडळी यांच्यात खरं तर भारत शोधून तिथं पोचण्याची जबरदस्त स्पर्धा जुंपलेली होती. जेंव्हा कोलंबस जहाजं भरभरून मिरच्या, इतर अमेरिकन पिकं आणि गुलाम युरोपात आणून ओतत होता त्यावेळी वास्को द गामा आपल्या मोहिमेच्या तयारीत होता. मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार आपल्या हातात ठेवण्यासाठी त्याला कोलंबसच्या आधी भारतात पोहोचायचं होतं. १४९८ ला भारतात येऊन दाखल झाला आणि इस १५०० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी Pedro Álvares Cabral हा भारतात यायला निघालेला असताना रस्ता चुकून (खरं तर समुद्रच चुकून!) ब्राझीलमध्ये जाऊन पोचला. आता या पोर्तुगीजांनी या नवीन भूमीतून जहाजं भरभरून मिरच्या आणायला सुरुवात केली.पोर्तुगीजांना मिरच्यांत खरं तर अजिबातच रस नव्हता पण त्यांनी आशिया खंडात मिरच्या आणून भारत, अरबस्तान आणि पूर्वेकडच्या इतर छोट्यामोठ्या देशात या धंद्याची ‘लाईन’ बसवली.

Pedro Álvares Cabral

भारतात मिरची बहुदा सर्वात पहिल्यांदा आली असावी केरळमध्ये कारण तिथूनच पोर्तुगीज मंडळींचा मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार चालायचा. भारतात तोवर तिखटपणासाठी काळी मिरीच वापरली जायची आणि वास्को द गामा भारतात आल्यापासून तीसेक वर्षात मिरचीनं भारतात आपली मुळं घट्ट रोवली. मिरची एवढी लोकप्रिय  होण्याचे मुख्य कारण म्हणजे मिरीपेक्षा एकतर ती स्वस्त असावी आणि दुसरं म्हणजे ती आपल्या परसातल्या बागेत पिकवता येणं शक्य होतं.
आज आपल्याला कुठलाही भारतीय तिखट पदार्थ मिरचीच्याऐवजी मिरीच्या चवीचा असणं कल्पनेतही सहन होत नाही.

आपली एक समजूत असती की संत मंडळी अतिशय सात्विक आहार घेत असावेत आणि त्यांना आपल्यासारखे फारसे जिभेचे चोचले नसतील पण १६व्या शतकात कर्नाटकातले प्रसिद्ध संत पुरंदर दास आपल्या एका रचनेत मिरचीचे गुणगान करताना म्हणतात – ‘वा  मिरचीबाई ! तू गरिबांचं रक्षण करणारी आहेस. तू आमच्या अन्नाची चव वाढवतीस. तुझी चव जहाल आहे आणि तुझी चव घेतली की काही काळ मला ईश्वराचाही विसर पडतो.’ यावरून असा अंदाज बांधता येईल की मिरची सामान्य जनतेच्या आहाराचा भाग बनलेली होती.

पुरंदरदास

तेराव्या शतकातले आणि ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन असणारे संत सावतामाळी त्यांच्या एका अभंगात म्हणतात –
कांदा मुळा भाजी । .
अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
यावरून २ निष्कर्ष निघू शकतात – मिरची १३व्या शतकात म्हणजे वास्को द गामा भारतात यायच्याआधी २शतकं महाराष्ट्रात उपलब्ध होती किंवा मिरची या अभंगात नंतरच्या काळात घुसडली गेली.

भारतात मिरची आली, रुजली आणि १६व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय मिरची तुर्कांमार्फत भारतीय मिरची जर्मनी, इंग्लड आणि नेदरलँडला जाऊन पोचली. पण ही मिरची नक्की कुठून जायची याबद्दल मला तरी अजून माहिती सापडलेली नाही. त्याशिवाय मराठी मुलुखात प्रसिद्ध असलेल्या ब्याडगी आणि जवारी या दोन मिरच्या नक्की कधीपासून अस्तित्वात आहेत याचाही शोध अजून लागलेला नाही.

मिरचीला chilli हे आधीच मिळालेलं नाव असताना भारतात तिचं नाव मिरची कसं काय पडलं? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेलच तर त्याचंही उत्तर मी देणार आहे. मिरचीच्या आधी भारतीयांच्या अन्नाच्या तिखटपणाची जबाबदारी काळ्या मिरीने उचललेली होती. मिरीला संस्कृतमध्ये ‘मरीच’ असं नाव आहे त्यामुळं परदेशातून आलेल्या आणि मिरीसारख्याच जहाल पदार्थाला मरिचिका हे नाव पडलं असावं आणि त्यावरून मिरची हे नाव रूढ झालं असावं. परदेशातून येऊन आणि स्थानिक मंडळींना मागे टाकून आपल्या हातात सत्ता घेण्याची मोठी परंपरा भारताला लाभलेली आहे.त्याला अनुसरूनच परदेशी मिरची भारतात आली आणि मिरीची जागा पटकावून बसली. ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ ही आपली मराठीतली म्हण यावरूनच तर पडली नसेल ना?

यशोधन जोशी

2 thoughts on “कानामागून आली आणि….

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: