चुकली दिशा तरीही – भाग १

’चुकली दिशा तरीही’ ही विंदांची कविता कधीतरी वाचनात आली होती. त्या कवितेतलं पहिलं वाक्य माझ्या कायमच स्मरणात राहिलं आहे. ’चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुशाफिराला सामिल सर्व तारे’ तर असे बरेच वेडे मुशाफिर केवळ ग्रहतार्‍यांच्या सहाय्याने वेगवेगळे प्रदेश शोधण्यासाठी प्राचीन काळापासून जगभर फिरत आले आहेत. या सगळ्या वेड्या मुशाफिरांचं महत्वाचं योगदान नवे प्रदेश शोधणे यापुरतेच मर्यादीत नाही तर त्यांनी फिरताना केलेल्या बारीक सारीक नोंदी आणि या नव्या भुभागाचे त्यांनी काढलेले नकाशे. हे नकाशे आता चुकीचे ठरले असले तरी या मुसाफिरांनी केलेल्या या प्रयत्नांना कुठेही उणेपण येत नाही. नकाशा तयार करणे ही अतिशय अवघड कला आहे. त्यात साधनांची वानवा असेल तर हे काम आणखीनच अवघड होऊन बसते. तर या वेड्या मुशाफिरांनी जगाला दिलेल्या या अमुल्य प्रयत्नांचा हा घेतलेला धांडोळा

Cartography म्हणजेच नकाशा किंवा तक्ते काढण्याचं शास्त्र. हे अतिशय अवघड काम आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. आजच्या गुगल मॅपच्या जमान्यात आपल्या हातातल्या मोबाईलमधेही आपण कुठलाही नकाशा क्षणार्धात बघू शकतो. पण हजारो वर्षांपूर्वीपासून नकाशे काढले गेले आहेत. भले त्यात अनेक चुकाही असतील, पण त्या काळात कुठलीही साधनं नसताना केवळ निरीक्षणांवरून नकाशा काढणे हे अत्यंत अवघड काम होते.

मानवाला नकाशा काढावा असं का वाटलं असेल? या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर देणं अवघड आहे. कदाचित काही धार्मिक कारणांसाठी त्यानी काही भागाच्या आकृत्या काढल्या असतील. आजही आपल्याला कातळशिल्प काढलेली आढळतात. अर्थात त्यांना काही नकाशे म्हणता येणार नाही पण या आकृत्यांपासून नकाशाच्या प्रवासाला सुरूवात झाली असावी का? अर्थातच हे काही ठामपणे सांगता येणार नाही. आपल्या मालकीच्या जागेचा विस्तार दर्शवण्यासाठी स्थानिक ठिकाणचे काढण्यात आलेले काही आराखडे यातूनही नकाशांची सुरुवात झाली असावी असाही एक विचार सापडतो. इजिप्तमधे अशा प्रकारची अनेक चित्रे सापडली आहेत. त्याबद्द्ल सविस्तर माहिती पुढे येईलच.

नकाशा हे तसं बघायला गेलं तर एक चित्रच. पण हे चित्र काढलं जात ते इंग्रजीमधे ज्याला Birds Eye-view म्हणतात त्यावरून. नकाशा हा कायम Top View नी काढलेले असतात. दोन जागांचे पृथ्वीवरचे अचूक स्थान, त्या दोन जागांमधले अंतर, दिशा, भौगोलीक वैशिष्टे सांगणे हे नकाशाचे काम. आज आपल्याकडे उपग्रह किंवा ड्रोनसारखी साधनं आहेत. मोठ्या भूभागाचा नकाशा काढण्यासाठी आज त्यांची मदत घेतली जाते. तरी आजही आपण आपल्या निरीक्षणातून नकाशे काढत असतोच. कोणी तुम्हाला एखादा पत्ता विचारला की केवळ पत्ता लिहून देण्याऐवजी आपण त्याला नकाशा काढून देतो. पत्त्यापेक्षा नकाशावरून ते ठिकाण सापडणे सोपे जाते. हे मात्र मर्यादित असते ते आपल्या शहरा किंवा गावापुरते. मात्र हजारो वर्षांपूर्वी लोकांनी केवळ निरीक्षणांवरून जगाचे नकाशे काढलेले आहेत.

नकाशांचा इतिहासातील प्रवास हा सरळ नसावा. नकाशाचा इतिहास हा नुसताच नकाशे रेखाटण्यापुरता मर्यादीत नाही. नकाशांचा आढावा घेताना दिशा, अक्षांश रेखांश यांचा वापर, पृथ्वीच्या आकाराबद्दल असलेल्या कल्पना अशा अनेक बाबींचाही विचार करावा लागतो. तार्‍यांवरुन दिशा ठरवून प्रवास केला जात असल्याने खगोलशास्त्राचाही याचाशी अतिशय निकटचा संबंध आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास हा अतिप्राचीन काळापासून केला जात आहे. आपल्या वेदांमधेही अनेक नक्षत्रांचा उल्लेख सापडतो. तसेच प्राचीन मेसोपोटेमियन संस्कृतीमधेही याचे पुरावे सापडतात. त्यामुळे नकाशांचे तंत्र या सगळ्यामुळे प्रगत होत गेले. सुर्याच्या उगवणे व मावळणे यावरुन दोन दिशा ठरल्या आणि पुढे त्यात आणखी सहा दिशांची भर पडली. पण हे लिहिले आहे तितके सरळपणे घडले नसेलच. दिशा कशा ठरवल्या गेल्या? त्यांना नावे कशी पडली? या प्रश्नांची उत्तरे मिळणे कठीण आहे. भूगोल, खगोलशास्त्र याचबरोबर कल्पनाशक्तीचा वापर करुन चित्र काढणे असे बरेच घटक नकाशाशी संबंधीत आहेत. या सगळ्या घटकांचा इतिहास शोधणे अवघड काम आहे.

मानवाने चित्रे काढायला सुरुवात सुमारे ३० हजार वर्षांपूर्वी केली आहे. पण नकाशा काढण्याची सुरूवात मात्र कधी झाली याचे पुरावे मात्र मिळत नाहीत. कदाचित हे नकाशे काढण्यासाठी कालौघात नष्ट होणार्‍या साहित्याचा उपयोग केला गेला असावा. तुर्कस्तानात कताल हुयुक(Catal Huyuk) येथील गुहांमधे काही भित्तिचित्रे सापडली आहेत. त्यातील एका चित्रावरून तो एखाद्या गावातील वस्तीचा नकाशा असावा असा कयास केला गेला आहे. वस्तीच्या बाजूलाच लाव्हारस बाहेर पडणारे दोन डोंगर दाखवले आहेत. संशोधकांच्या मते हा नकाशा कताल हुयुकच्या जवळ असलेला हसन डाग (Hasan Dag) या भागाचा असावा. हसन डाग येथे असे डोंगर आहेत. तरीही हसन डाग हे ठिकाण कताल हुयुक पासून सुमारे ६० मैलांवर आहे. त्यामुळे एवढ्या लांबच्या (त्याकाळी ते लांबच म्हणले पाहिजे) भूभागाचा नकाशा येथे काढण्याचे काही कारण नाही. या चित्राचा कालावधी इ.स.पू. ६२०० असावा असा प्राथमिक निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला होता. पण नंतर केलेल्या संशोधनात हा काळ इ. स. पू. ८००० पर्यंत मागे गेला आहे. गावाच्या या नकाशात मातीच्या भिंती आणि एकमेकांना खेटून असलेली घरेही दाखवली आहेत. यात कुठेही गावातले रस्ते दाखवलेले नाहीत. हा नकाशा नक्की कुठल्या भूभागाचा असावा हे मात्र अजूनही संशोधकांनी ठामपणे सांगता आलेले नाही.

Çatalhöyük येथील भिंतीवर काढलेला नकाशा

यानंतरचा पुरावा सापडतो तो बॅबोलोनियन संस्कृतीत. इराक आणि आजुबाजुचा प्रदेश मिळुन बॅबिलोनिया बनला होता. एका मृदपट्टीकेवर हा नकाशा काढलेला आहे. यात डोंगर, वाहणारी नदी आणि स्थानिक लिपीमधे स्थळांची नावे कोरलेली आहेत.

इ. स. पू. २१०० मधील बॅबिनोलियामधील प्रिन्स गुडिआ (Gudea) याच्या प्रतिमा सापडल्या आहेत. त्यातील एका प्रतिमेवर एक नकाशा काढलेला आहे. कदाचित तो म्हणजे एखाद्या मंदिराचे विधान (Plan) असावे.

आणखी एक नकाशा सापडला आहे मृद पट्टिकेवर काढलेला. गोल आकारात काढलेल्या या नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे यात चार दिशा दाखवलेल्या आहेत. साधारणत: याच कालावधी मधील ग्रीक, रोमन आणि चीनी संस्कृतीतील नकाशे सापडले आहेत. हे नकाशे काढण्यासाठी मृदपट्ट्यांबरोबर जनावरांच्या कातड्याचाही उपयोग केलेला आढळतो.

इजिप्तमधे सापडलेला Turin Papyrus हा नकाशाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या नकाशातही वाहणारी नदी, डोंगर आणि दिशांचे रेखाटन करण्यात आलेले आहे. याचबरोबर इजिप्तमधे काही भौमितीक आकार काढलेली रेखाटने सापडली आहेत. नाईल नदीला दरवर्षी पूर येतो. त्याचे पाणी भूभागावर पसरते आणि मग या भूभागाच्या सीमारेषा बदलतात. या बदललेल्या सीमारेषा दाखवणारी ही रेखाटने आहेत. त्यांना नकाशे नाही म्हणता येणार फारतर विधान (Plan) असं म्हणता येईल. पण ही Top viewनी काढलेली रेखाटने म्हणजे नकाशांची सुरुवातच होती. प्रवासाला निघालेल्या प्रवाशाबरोबर त्याला जिथे पोहोचायचे आहे त्याचा नकाशा हवाच. काही मृत व्यक्तींच्या कबरींमधेही असे नकाशे ठेवले जात असत.

त्यावेळी पृथ्वीविषयी काही गंमतीशीर संकल्पना होत्या. या संकल्पनांपैकी एका संकल्पनेमुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. ती संकल्पना होती पृथ्वीच्या आकाराची. पृथ्वी ही आकाराने आयताकृती असून ती दाबाखाली असलेल्या हवेने वेढलेली आहे असा एक विचारप्रवाह होता तर पृथ्वी ही तबकडीसारखी चपटी असून ती समुद्रांनी वेढेलेली आहे असाही एक मतप्रवाह होता. अनेक प्राचीन नकाशांमधे समुद्राने वेढलेली पृथ्वी दाखवलेली आहे.

यात ग्रीकांनी काढलेले नकाशे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इ.स.पू ६ व्या शतकात अनॅक्सिमॅंडर (Anaximander) ने काढलेल्या नकाशात पृथ्वी गोल असून त्यात युरोप, आशिया आणि लिबिया हे तीन खंड दाखवले आहेत. यात तीन खंड समुद्राने वेढलेले असून युरोप व आशिया मधे काळा समुद्र तर लिबिया आणि आशिया मधे नाईल नदी दाखवली आहे. प्रसिध्द ग्रीक तत्वज्ञ प्लेटो हा पायथॅगोरसचा अनुयायी होता. पृथ्वी गोल असल्याचे विधान पहिल्यांदा प्लेटोने केले होते. ग्रीक खगोलशास्त्रज्ञ इरॅटोस्थेनीस (Eratosthenes) याने पहिल्यांदा पृथ्वीचा परिघ मोजण्याचा प्रयत्न केला. तो २४६६२ मैल असल्याचा उल्लेख त्याने केलेल्या नोंदीमधे आढळतो. ही संख्या पृथ्वीच्या वास्तविक परिघापेक्षा फक्त ५० मैलाने कमी आहे.

ग्रीक नकाशांमधे सगळ्यात महत्वाचे काम केले आहे ते टॉलेमीने. तो गणिती, खगोल आणि भूगोलशास्त्रज्ञ होता. त्याने लिहिलेला ’जिओग्राफी’ हा भूगोलावर लिहिलेला आणि जगाला ज्ञात असलेला पहिला ग्रंथ असावा. त्याकाळी जहाजाने प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांना तो भेटत असे. त्यांच्याकडून तो त्यांनी भेट दिलेल्या भूभागांची वर्णने ऐकत असे. या प्रवाशांनी केलेली वर्णने अतिशयोक्त असतात त्यामूळे त्या भूभागाची इथ्यंभूत माहिती मिळत नसली तरी दिशा, स्थान, अंतर याची खात्रीशीर माहिती मिळते’ असे तो म्हणत असे. अक्षांश रेखांशाची कल्पना टॉलेमीने पहिल्यांदा मांडली. एखाद्या जागेचे भौगोलीक स्थान सांगण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे हे त्याने जाणले होते. टॉलेमीच्या पुस्तकात त्याने जवळ जवळ ८००० जागांचे भौगोलीक स्थान दिले आहे. लेखाच्या सुरुवातीस दिलेला नकाशा हा १५ व्या शतकात छापलेला आहे. टॉलेमीच्या पुस्तकात आलेल्या वर्णनावरून हा बनविण्यात आला होता.

आपल्या देशात नोंदी ठेवण्याची फारशी परंपरा नाही. मौखिक परंपरेवरच आपला जास्त भर राहिला आहे. त्यामुळे प्राचीन काळातले लिखित ग्रंथही फारसे उपलब्ध नाहीत. तरीही आपल्या पुर्वजांना नक्षत्र, खगोलशास्त्र, भूमिती या विषयांचे सखोल ज्ञान होते. पण नकाशाच्या क्षेत्रात त्यांनी फारसे काम केलेले आढळत नाही किंवा त्यांनी केलेले काम कालौघात नष्ट झाले असावे.

नकाशा या विषयाच्या अभ्यासाचे प्रामुख्याने दोन टप्पे दिसतात. टॉलेमीनंतर युरोपातही साधारणत: १३-१४ व्या शतकापर्यंत या विषयात फारसे काम झाले नाही. हा काळ युरोपचा Dark Period समजला जातो. युरोपात सगळीकडे धर्माचा जबरदस्त पगडा होता. सर्व प्रकारच्या संशोधनावर धार्मिक संस्थांचे नियंत्रण होते आणि या धार्मिक संस्थांना कोणीही प्रश्न विचारू शकत नव्हते. साधारणत: १३ व्या शतकानंतर यात बदल झाला. हा Renaissance Period होता. यानंतर मात्र सगळ्याच क्षेत्रातील संशोधनात अतिशय मुलभुत असे काम झालेले आढळते.

युरोपातल्या Dark Period मध्येही हे प्राचीन काळातले काम वाचवले ते पर्शियन र्लोकांनी. बगदादचा खलिफा हरून अल रशिद हा आपल्याला माहिती आहे तो त्याच्या जगप्रसिध्द ’अरेबियन नाईट‍स’ या ग्रंथामुळे. या ग्रंथात त्याने अनेक वेगवेगळ्या भूभागांचे वर्णन केलेले आहे. त्याने अर्थातच ही वर्णने त्याला मिळालेल्या ऐकीव माहिती वरून लिहिली आहेत. काही प्रमाणात अतिश्योक्तीपूर्ण असली तरी ती अनेक भूभागांबद्दल बर्‍याच प्रमाणात अचुक माहिती देतात. हरून अल रशिद आणि त्याचा मुलगा अल मामुन यांना ग्रीक गंथांचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांच्या संग्रहात असलेले हे ग्रीक ग्रंथ या Dark Period मधेही वाचले आणि पुढे हे ज्ञान जगासमोर येऊ शकले. हरून अल रशिदने रोमन साम्राज्यावर चढाई केली. रोमन सम्राटाने हरून बरोबर तह केला.

सोन्यानाण्याबरोबरच हरूनने रोमन साम्राज्यात असलेले अनेक ग्रीक ग्रंथ आपल्या संग्रहात आणले आणि त्या ग्रंथांचे भाषांतर करून घेतले. हरूननंतर त्याचा मुलगा अल मामुननेही ही परंपरा चालू ठेवली. त्याने या ग्रंथांच्या अभ्यासासाठी आणि भाषांतर करण्यासाठी एक वेगळी संस्था स्थापन केली. पर्शियन लोकांनी केलेले हे योगदान फार मोठे आहे. नकाशा विषयावर या Dark Period मधे जे काही थोडे काम होत होते ते या इस्लामिक प्रदेशातच. पर्शियन आणि अरब संशोधकांनी या कालखंडातही या विषयात काम चालू ठेवले.

८ व्या शतकात अल ख्वार्झिनी नावाच्या संशोधकाने खगोलशास्त्रात अतिशय महत्वाचे काम केलेले आढळते. याच अल ख्वार्झिनीने लिहिलेला ’अल जब्र वल मुकाबला’ हा ग्रंथ आजच्या बीजगणिताचा आद्यग्रंथ समजण्यात येतो. ९ व्या शतकात जन्मलेल्या लांबलचक नाव असलेल्या अल मसुदीने (अबुल हसन अली इब्न हुसेन इब्न अली अल मसुदी असे संपुर्ण नाव आहे) नकाशाच्या शास्त्रात अतिशय महत्वाचे काम केले आहे. अल मसुदी हा भूगोलाचा अभ्यासक होता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक प्रदेशातून प्रवास केला. प्रत्यक्ष प्रवास करून त्याने आपली निरिक्षणे ’मुरुज अल तहब’ या ग्रंथात नोंदवली आहेत. त्याने बगदाद, गुजराथ, श्रीलंका, चीन, मादागास्कर, झांझिबार, ओमान आणि बसरा असा मोठा प्रवास केला. त्याने नोंदवलेली निरिक्षणे अचूक आहेत. इ. स. ९५७ मधे कैरो मधे त्याचे निधन झाले.

टोलेमीनंतर अरब देशांमधे झालेले हे तुरळक काम सोडल्यास जगभरात कुठे या विषयातले काम झाल्याचे सापडत नाही. येथे नकाशांच्या प्रगतीचा पहिला टप्पा संपतो. Renaissance नंतर नकाशाच्या शास्त्रात जे काही काम झाले त्यामुळे बरीच उलथापालथ होणार होती.

कौस्तुभ मुद्‍गल

2 thoughts on “चुकली दिशा तरीही – भाग १

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: