सदैव सैनिका पुढेच जायचे…

वेदना आणि मनुष्य यांचं नातं फार प्राचीन आहे, मानवाच्या एकूण वाटचालीत विविध वेदनांनी त्याला किती त्रास दिला असेल याची  आपल्यासारख्या रसायनजीवी पिढीतल्या लोकांना कल्पनाही येणार नाही. वेदनाशमनासाठी अफूचा वापर पूर्वापार केला जात असे पण अफूमुळे गुंगी येत असे आणि या अफूचे व्यसन लागण्याचा धोका हा होताच. ज्या औषधाने वेदना जाणवणार नाहीत अशा औषधाचा शोध युरोपमधल्या औद्योगिक क्रांतीच्या आसपासच सुरू झाला.अनेक वैज्ञानिक यासाठी धडपडत  होते. त्यातच Wilhelm Adam Sertürner हा एक जर्मन शास्त्रज्ञही होता. 

एके रात्री त्याची दाढ भयंकर ठणकत असल्याने त्याला मुळीच झोप लागत नव्हती. दुखण्याकडे थोडं दुर्लक्ष व्हावं म्हणून Sertürner आपल्या प्रयोगशाळेत काही प्रयोग करत बसलेला होता. आणि अफूची बोंडे उकळून त्यावर विविध प्रक्रिया करताना त्याला अचानक मॉर्फीनचा शोध लागला आणि लाखो वर्षांच्या वेदनेला औषध मिळाले. ते वर्ष होतं १८०४, म्हणजे इकडं महाराष्ट्रात वसईचा तह करून दुसरा बाजीराव पेशवा स्वस्थ बसल्याला फक्त दोन वर्ष झालेली होती. 

मॉर्फीनला Sertürner नं दिलेलं नाव होतं morphium जे ग्रीक पुराणातील स्वप्नांचा देव  असणाऱ्या Morpheus वरून घेतलेलं होतं. Morphium वर विविध प्रयोग होत होत मॉर्फीन तयार व्हायला आणि त्यानं आपलं बस्तान बसवायला १८१७ साल उजाडलं. मॉर्फीनमुळे रणांगणावर लढणाऱ्या सैनिकांना जणू संजीवनीच मिळाली. 

शरीराला लागलेल्या मारासाठी मॉर्फीन आता उपलब्ध होतं पण मनाला लागणाऱ्या माराचं काय? तर यासाठीचं औषध आधीपासूनच उपलब्ध होतं. जगभरात अनेक ठिकाणी सापडणारी Ephedra ही वनस्पती त्यासाठी वापरली जाई. Ephedra च्या रसाचा वापर करून मनाला उभारी देणारे, उत्साह आणि जोम वाढवणारे द्रव्य तयार केले जाई. चीनमध्ये याचा वापर रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या सैनिकांना जागे आणि सतर्क ठेवण्यासाठी केला जाई. या Ephedra बद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची तर आपल्या वेदात आणि महाकाव्यात जागोजागी उल्लेख येणारी सोमवल्ली, म्हणजे जिच्यापासून सोमरस तयार होतो ती म्हणजेच Ephedra असं काही अभ्यासकांचं मत आहे. 

जपानी शास्त्रज्ञांनी १९ व्या शतकापासून Ephedraवर  संशोधन करायला सुरुवात केली. १८८७ साली जपानी रसायनशास्त्रज्ञ Ogata यानं Ephedrine तयार केलं जे जवळपास आणिबाणीच्याप्रसंगी आपल्या मेंदूला आणि शरीराला उभारी देणाऱ्या adrenaline सारखंच होतं. १९२७ साली ब्रिटिश शास्त्रज्ञ Gordon Alles नं याच श्रेणीतले वरचे प्रयोग करत करत Amphetamine चा शोध लावला. नैराश्य घालवणारे, मनाला उभारी देणारे हे नवे संशोधन त्याने Smith Kline & French या कंपनीला विकले. आणि Benzedrine या नावाने त्याचे inhaler १९३२ साली बाजारात आले.

त्याचवेळी इकडं जर्मनीत पहिल्या महायुद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे आणि गेलेली पत पुन्हा मिळवण्याचे मनसुबे रचले जात होते. १९३७ सालातल्या एका दिवशी डॉक्टर Hauschild हा एक औषध निर्मिती शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत काही खुडबुड करत होता. काचेच्या भांड्यात काही रसायनं उकळत होती, त्यांची वाफ दुसऱ्या चंबूत गोळा होत होती त्यातच दुसरी रसायनं मिसळली जात होती. शेवटी एकदाचं त्याला हवं असणारं रसायन तयार झालं.त्याच्या चाचण्या प्राण्यांवर आणि माणसांवर करून बघितल्यावर Hauschild ला आपल्या प्रयोगाची उपयुक्ततेची खात्री पटली आणि त्यानं या तयार झालेल्या औषधाला नाव दिलं Volksdroge म्हणजे सर्वसामान्यांचे औषध.Hauschild ज्या कंपनीसाठी काम करायचा  तिनं Pervitin या नावानं हे औषध बाजारात आणलं. 

पहिल्या महायुद्धाच्या काळापर्यंत शक्तिवर्धक औषधं घेणे म्हणजे पौरुषहिनता, दौर्बल्य मानलं जाई. अशी औषधं घेणाऱ्याना कडक शिक्षा होई. पण आर्यन वंशाला मानहानीकारक असा महायुद्धातील पराभवावरून हिटलरने जर्मनीला चेतवायला केलेली सुरुवात आणि Hauschild नं शोधून काढलेल्या methamphetamine चा उदय हा जवळपास एकाच काळातला. हिटलरच्या स्वप्नातला बलवान आणि शक्तिशाली जर्मनी घडवायला methamphetamine पुढं आलं. जर्मनीने जोरदार सैनिकीकरण सुरू केले आणि या फौजेची ताकत वाढवण्यासाठी विविध प्रयोग सुरू झाले. 

१९३९ साली जर्मनीने दुबळ्या पोलंडवर हल्ला केला. हे आक्रमण इतकं वेगवान होतं की पोलंडला सावरायला वेळच मिळाला नाही. पॅन्झर रणगाडे, स्टुका ही बॉम्बर विमानं आणि पायदळ यांनी एकत्रितपणे केलेला वेगवान हल्ला म्हणजेच Blitzkrieg. यातली सर्वात कमकुवत कडी म्हणजे पायदळाच्या हालचाली. त्यांच्या पुढं जाण्याच्या वेगाला मर्यादा होत्या, काही काळानंतर अन्नाची/विश्रांतीची गरज त्यांना भासत असे पण त्यामुळं लष्करी डावपेचांना अडथळा येत असे.  पण हे सैनिक न थांबता सतत पुढं सरकत होते, त्यांच्यातला उत्साह मुळीच कमी होत नव्हता. ते अतिशय सजग होते, कुठल्याही धोक्याची त्यांना भीती वाटत नव्हती एवढंच काय तर त्यांना भूक आणि झोपेचीही आठवण होत नव्हती. हा बदल घडवून आणला होता Pervitin नं. Pervitin चा खुराक घेतलेले हे सैनिक सतत ४८-६० तास पुढं सरकत होते.  

Pervitin चा वापर अद्याप मर्यादित असला तरी त्याचे गुण सगळ्याच सैनिकांच्या ध्यानात आलेले होते. हे सैनिक आपल्या घरी पाठवलेल्या पत्रात Pervitin ची भलावण करत होते, लष्करात त्यांचा पुरवठा मर्यादित असल्यानं घरच्यांना या गोळ्या पाठवून देण्याची मागणीही करत होते. लौकरच Pervitin ची उपयुक्तता लक्षात येऊन सैन्याला त्याचा मुक्त पुरवठा सुरू झाला.

Dr. Ranke हा जर्मनीच्या लष्करी आरोग्यसेवेत असणारा एक बडा अधिकारी होता, Pervitin मुळं वाढलेली क्षमता उपयोगात आणून जर्मनीला पुन्हा गतवैभव मिळवून देणे हे त्याचे उद्दिष्ट होते. त्याने या औषधाचा पुरवठा वाढवणे गरजेचे आहे अशी शिफारस केल्यावर Pervitin तयार होणाऱ्या Temmler Werke कंपनीच्या कारखान्यातून आता दिवसाला ८ लाख गोळ्यांचे उत्पादन व्हायला लागले. एप्रिल ते जून १९४० च्या दरम्यान जवळपास ६० लाख गोळ्यांचे वाटप पायलट, रणगाडे चालक आणि भूदलातील सैनिकांना करण्यात आले. पायलट आणि रणगाडे चालक यांच्यासाठी Pervitin ची चॉकलेट तयार करण्यात आली. त्यांना Fliegerschokolade  (flyer’s chocolate) आणि Panzerschocolade अशी नावं देण्यात आली. १९४० च्या एप्रिल महिन्यात डेन्मार्क आणि नॉर्वे, मे महिन्यात बेल्जियम असे आगेकूच करत जर्मन सैन्य फ्रान्सच्या सीमेवर येऊन पोचले. 

या दरम्यान ज्यांची विचारशक्ती अजून ताळ्यावर आहे असे काही लोक जर्मनीत अजूनही शिल्लक होते, त्यापैकी एक होता   स्वतः डॉ असणारा आणि जर्मन आरोग्यसेवेचा प्रमुख Leo Conti. तो जर्मन सरकारला वारंवार Pervitin च्या वापरावर प्रतिबंध आणण्याची गरज बोलून दाखवत होता, खुल्या बाजारात  Pervitin सर्वांसाठी उपलब्ध असू नये म्हणून सरकारला विनंतीपत्रे पाठवत होता पण त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नव्हते. पण आता हळूहळू सैनिकांकडून या गोळ्यांबद्दल वारंवार तक्रारी यायला लागलेल्या होत्या. अन्नावरची वासना कमी होणे, निद्रानाश, सदैव जाणवणारी अस्वस्थता ही लक्षण बऱ्याचशा सैनिकांना जाणवू लागलेली होती काहींना तर हृदयविकाराचा त्रासही सुरू झालेला होता. त्यामुळं याची काही प्रमाणात तरी दखल घेणं लष्कराला भाग पडलं. जर्मनीच्या लष्करी आरोग्यसेवेत असणाऱ्या Ranke च्या शिरावरच Pervitin च्या सुयोग्य वापराबाबत नियमावली तयार करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्याने लष्करी दलांसाठी या गोळ्यांच्या सेवनाची जी पद्धत तयार केली ती अशी होती- जेंव्हा कोणतीही मोहीम असेल किंवा एखादी जोखमीची कामगिरी असेल  तेंव्हाच यांचा वापर व्हावा. गोळ्यांचा डोस अशा प्रकारे घ्यावा – दिवसा १ गोळी, रात्री पुन्हा २ गोळ्या आणि गरज पडल्यास ४ तासाने पुन्हा २ गोळ्या. अर्थात ही नियमावली विजयाची धुंदी चढलेल्या जर्मन सेनानी आणि सैनिकांनी फारशी मनावर घेतली नाही.

फ्रान्सच्या सीमेच्या आसपास पोचलेल्या जर्मन सैन्याचा सेनानी जनरल Heinz Guderian नं आपल्या सैन्याला संबोधित करताना सांगितलं की फ्रान्सच्या सैन्याला प्रतिकाराची संधी न देता जर पुढं सरकायचं असेल तर किमान ३-४ दिवस आपल्याला न थांबता आगेकूच करत रहावे लागेल. आता पुन्हा नियमावली डावलून Pervitin चा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता. फ्रान्सवर चढाई करणाऱ्या या सैन्याला Pervitin चा अमाप पुरवठा करण्यात आला. फक्त 1st Panzer division च्या सैनिकांनाच जवळपास २५ हजार गोळ्या वाटण्यात आल्या. १० मे १९४० ला फ्रान्सवरच्या आक्रमणाला सुरुवात झाली.  गडबडलेल्या फ्रेंच सेनेला मागे रेटत जर्मनीची आगेकूच सुरू होती. सलग १७ दिवस न थांबता लढत राहून जर्मन सैन्याने हा पल्ला गाठला. हिटलरला जर्मन सैन्य फ्रेंच भूमीत खोलवर आत शिरल्याचा संदेश पोचल्यावर तो ही चकित झाला आणि त्याने Guderian ला उलट संदेश पाठवला की तुम्ही चुकीचा संदेश पाठवलेला आहे. चर्चिलनेही या भयंकर वेगवान चढाईचा उल्लेख ‘आश्चर्यकारक’ असा करून ठेवलेला आहे.

फ्रान्सच्या पाडावानंतर आता फ्रेंचभूमीवरून इंग्लंडवरच्या हल्ल्याच्या योजना सुरू झाल्या. हवाई हल्ले करून इंग्लंडला बेजार करण्यात येऊ लागले. ब्रिटिश तोफखान्यापासून बचाव व्हावा म्हणून हे हल्ले रात्रीच्या वेळी करण्यात येत. रात्री ११ वाजता फ्रान्समधून उड्डाण करून जर्मन विमानं मध्यरात्री लंडन आणि इतर शहरांवर पोचत आणि मग हल्ला सुरू करत. या हल्ल्यात सहभागी झालेले पायलट्स हे Pervitin घेऊनच निघत आणि इंग्लंडवर पोचल्यावर पुन्हा एक खुराक घेऊन हल्ल्याला सुरुवात करत. जर्मन पायलट्समध्ये Pervitin ला Pilot salt, Stuka pills किंवा Göring pills या नावाने ओळखले जाई.

Conti बरोबरच इतर शास्त्रज्ञही आता Pervitin च्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल बोलू लागलेले होते. ThePervitin problem म्हणून वृत्तपत्रातही याबद्दल चर्चा होऊ लागलेली होती. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू Pervitin चा वापर हळूहळू कमी केला जाऊ लागला. सामान्य जनतेसाठी तर याचा पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आला.

हळूहळू जर्मनीची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट होऊ लागली, रशियावरचे फसलेले आक्रमण आणि दोस्तांची वाढती ताकत यामुळे पिचलेल्या जर्मन सैन्याला पुन्हा पुन्हा पराभूत व्हावे लागू लागले. रशियातून जीव वाचवून माघार घेताना फक्त Pervitin मुळेच हजारो सैनिकांचे जीव वाचले. १९४४ साली पुन्हा एकदा चमत्काराची अपेक्षा ठेवून Pervitin पेक्षा जास्त ताकतीच्या गोळ्यांच्या निर्मितीसाठी जर्मनीत धडपड सुरू झाली. त्यानुसार D-IX या नवीन रसायनाची निर्मिती करण्यात आली, त्याच्या चाचण्या छळछावणीतल्या कैद्यांवर करून त्यांच्याकडून युद्धसाहित्य निर्मितीचे काम वेगाने करून घेण्यात यशही आले. पण तोवर जर्मनीचा पराभव झाल्यामुळे हा नवीन शोध कधीच उपयोगात आला नाही. 

जर्मन्स कशाप्रकारे रसायनांच्या अमलाखाली युद्ध करत होते हे आपण बघितलं पण दोस्तसेनाही या बाबतीत मागे नव्हत्या. १९४० साली पकडला गेलेल्या जर्मन पायलटकडून Pervitin सापडल्यावर Henry Dale या ब्रिटिश शास्त्रज्ञाने त्यात methamphetamine असल्याचा शोध लावला आणि त्याचा उपयोग युद्धखात्याला  सांगितला. Amphetamine नावाचं रसायन इंग्लंडकडे आधीच तयार होतं त्याचा वापर करून त्यांनी Benzedrine नावाच्या गोळ्या तयार केल्या आणि त्यांचा वापर सुरू केला. लौकरच अमेरिकेलाही ही बातमी कळली आणि त्यांनीसुद्धा या गोळ्यांचा वापर सुरू केला. म्हणजे ज्या काळात जर्मन्स हळूहळू यातून बाहेर पडत होते तेंव्हा ब्रिटिश आणि अमेरिकन मात्र याच्या आहारी चाललेले होते.

अमेरिकेतून समुद्रमार्गे येणारी रसद आणि युद्धसाहित्याची जहाजे यांना संरक्षण देण्यासाठी हवाईदलाला सतत दक्ष रहावे लागे. आता Amphetamine मुळे न थकता सजगपणे पायलट्स आपले काम करू लागले. पायलट्सचा साथीदार म्हणून या गोळ्यांना co-pilot हे नाव पडलं. जर्मन सेनानी रोमेल आणि त्याच्या अजेय afrika korps विरुद्ध विजय मिळवणारा जनरल मॉंटगोमेरी याने प्रसिद्ध अशा El- Alamein च्या लढाईआधी जवळपास एक लाख Benzedrine चे वाटप आपल्या सैनिकांना केले. (जवळपास २५,००० भारतीय सैन्य या लढाईत सहभागी झालेले होते त्यानाही Benzedrine मिळालेल्या होत्या काय याबाबत मात्र काही पक्की माहिती नाही) जपानविरुद्ध पॅसिफिक समुद्रात आणि त्यातल्या बेटांवर लढताना अमेरिकन सैन्यानेही Benzedrine चा पुरेपूर वापर केला. अमेरिकेने वापरलेल्या एकूण गोळ्यांचा हिशोब माहीत नसला तरी ज्या Smith Kline & French या कंपनीने अमेरिकन लष्कराला एकूण ८,७७,००० डॉलरच्या Benzedrine गोळ्या पुरवल्या. त्याशिवाय इंग्लंडने अमेरिकेला ८० लाख गोळ्या पुरवल्या त्या वेगळ्याच. 

जपाननेही या रसायनांच्या लढाईत सहभाग घेतलेलाच होता. सैन्यदले ते युद्धसाहित्य तयार करणाऱ्या कारखान्यात काम करणारे कामगार methamphetamine पासूनच तयार करण्यांत आलेल्या Philopon किंवा Hiropin या गोळ्यांचा वापर करत. याशिवाय आत्मघातकी हल्ले करणारे तरुण kamikaze पायलट methamphetamine ची इंजेक्शन्स घेऊनच विमानात बसत. महायुद्ध संपल्यावर जपानी सैनिक घरोघर परतले, युद्धसाहित्याचेकारखाने बंद झाले पण या गोळ्यांची सवय लागलेली जपानी जनता गोळ्यांशिवाय अस्वस्थ झाली. सरकारी कारखान्यात तयार झालेला आणि वापरात न आलेला साठा काही प्रमाणात सरकारी दवाखान्यात आला पण बराचसा माफिया टोळ्यांच्या हाती लागला. यातून टोळीयुद्ध होऊन अंगभर चित्रविचित्र गोंदकाम केलेल्या Yakuza या माफिया टोळीचा उदय झाला.

महायुद्ध संपलं तरी जगाचं कारभारीपण करायची सवय लागलेल्या अमेरिकेला पुढं अनेक युद्धं खेळावी लागली. तिथंही त्यांनी सैनिकांची शारीरिक क्षमता वाढावी म्हणून अनेक रासायनिक औषधांचा वापर केला आणि अजूनही करत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे जगाच्या पुढचा नवीन धोका ठरलेल्या ISIS कडेही Captagon  या नावे​​ ओळखल्या जाणाऱ्या amphetamine पासून तयार झालेल्या गोळ्या सापडत आहेत आणि धर्माच्या अफूबरोबरच या गोळ्यांचाही वापर सैनिकांना चेतवण्यासाठी केला जात आहे.

यशोधन जोशी

संदर्भ

Peter Andreas – Killer High_ A History of War in Six Drugs 

Norman Ohler & Shaun Whiteside, – Blitzed_ drugs in Nazi Germany

3 thoughts on “सदैव सैनिका पुढेच जायचे…

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: