कपड्यांची इस्त्री

कुठल्याही वस्तूच्या शोधाबद्दल लिहिताना लिहिले जाणारे पहिले वाक्य म्हणजे या वस्तूचा शोध कधी लागला, पण इस्त्रीबद्दल शोधाबद्दल फारशी माहिती मिळत नाही. पण इस्त्रीची सुरवात बघायला गेल्यास तिचे आद्य स्थान सापडते ते चीनमध्ये. तेथील लोक कपड्यांना मुलायम बनवण्यासाठी धातूच्या पसरट भांड्यात पेटते कोळसे ठेवत व कापड पसरून त्यावरुन ते भांडे फिरवत. याच सुमाराला युरोपमधे सुरकुतलेल्या कपड्यांना कडकपणा आणण्यासाठी पसरट व गुळगुळीत दगड, काच किंवा लाकडाचा उपयोग केला जात असे. युरोपमधे झालेल्या उत्खननात असे अनेक हॅण्डल असलेले गुळगुळीत दगड मिळाले आहेत.

१५ व्या शतकात युरोपमधे कपड्यांना इस्त्री करण्यासाठी मँगल बोर्डचा उपयोग केला जात होता. एका लाकडी दंडगोलाकार तुकड्यावर ओलसर कापड गुंडाळले जात असे. मग या कापडाला इस्त्री करायची असे ते कापड एका मोठ्या टेबलावर अंथरुन हॅण्डल असलेल्या एका चपट्या फळीने त्याला टेबलावरील कापडावर फिरवले जात असे. या चपट्या फळीला मॅंगल असे म्हणले जात असे. हे मॅंगल्स फर वृक्षाच्या तयार लाकडापासून केले जात व त्याचा खालचा भाग हा गुळगुळीत केलेला असे. नॉर्वे या देशात अजूनही त्यांचा उपयोग केला जातो. सुंदर कोरीवकाम केलेले मॅंगल्स नववधूला देण्याची प्रथा होती. ही प्रक्रिया आपण पोळपाटावर पोळी लाटतो तशी होती. १९ व्या शतकात लाटण्याच्या या प्रक्रियेला यांत्रिकी जोड देण्यात आली. वाफेच्या शक्तीवर चालणारे मॅंगल्स बनवण्यात येऊ लागले. ’द स्टिल रोल मॅंगल कं.’ या शिकागो येथील कारखान्यात १९०२ साली घरगुती वापरासाठी मॅंगल तयार केले. यात गॅसने रोलर गरम केले जाऊन ते कपड्यांवर फिरवण्याची रचना असे. १९३० साली विजेवर चालणारे मॅंगल्स वापरात आले.

साधारणत: १८ व्या शतकापासून लोखंडापासून इस्त्री बनवण्यात येऊ लागली. लोखंडाप्रमाणे इस्त्री बनवण्यासाठी ईटलीत सोप स्टोन तर फ्रान्समधे टेराकोटा यांचाही वापर केला गेला. ही इस्त्री आगीवर गरम करुन कपड्यांवर फिरवली जाई. लोखंडापासून लोहार गुळगुळीत तळ असलेली इस्त्री याच काळात बनवू लागले होते. या इस्त्रीच्या वरच्या बाजूस लाकडी मुठ असलेले हॅण्डल असे. ही इस्त्री भरीव लोखंडापासून बनवली जात असे त्यामुळे ती वजनदार असे.यावरूनच ironing हा शब्द तयार झाला असावा. इंग्रजी Solid या शब्दापासून या इस्त्रीला Sadiron असे ही नाव पडले. यांना आधी आगीवर तापवले जात असे पण या लगेच थंडही होत असत. मग अशावेळी दोन इस्त्र्या वापरल्या जात असत. एकीचा वापर चालू असताना दुसरी इस्त्री आगीवर गरम करण्यास ठेवली जात असे. यावर उपाय म्हणून यानंतर आलेल्या इस्त्र्यांमधे वरच्या बाजूस एक कप्पा असे. या कप्प्यात पेटते कोळसे ठेवले जात. यामुळे इस्त्रीचा तळ गरम रहात असे व गरम झालेली इस्त्री कपड्यांवरुन फिरवली जात असे. आजही अनेक इस्त्रीवाले अशा इस्त्र्या वापरतात. केरळमध्ये कोळश्यांऐवजी नारळाच्या शेंड्यांचा वापर केला जातो. पुढे ही इस्त्री तापवण्यासाठी रॉकेल, इथेनॉल, गॅस अशा वेगवेगळ्या इंधनांचा उपयोग केला गेला. या सगळ्या इस्त्र्या घरगुती वापरासाठी कुचकामी होत्या.

१९ व्या शतकाच्या अखेरीस वीजेवर इस्त्री गरम करण्याचे अनेक प्रयत्न झाले. १८८० साली न्यूयॉर्क येथील हेन्री सिली या संशोधकाने वीजेवर तापवता येणार्‍या इस्त्रीची निर्मिती केली व १८८२ साली त्याला त्याचे पेटंट मिळाले. हेन्रीने १८८३ साली आपला सहकारी डायर याच्या बरोबर आणखी एका वेगळ्या इस्त्रीचे पेटंट मिळवले. विजेवर चालणारी इस्त्री कायम विजेशी जोडलेली असल्याने सतत गरम रहात असे. डायरने वायर न वापरता वीजेवर तापवता येणारी इस्त्री बनवली. स्टॅण्ड वीजेवर तापवून त्या स्टॅण्डवर इस्त्री ठेऊन तापवली जात असे.

seelyselectricirons

१९०५ साली कॅलिफोर्निया येथील अर्ल रिअर्डसन या संशोधकाने हॉटपॉईंट या नावाने इस्त्री बाजारात आणली व ही इस्त्री बाजारात मोठ्या प्रमाणात विकली गेली. १९१२ साली हॉटपॉईंट इलेक्ट्रिक हिटिंग कंपनी या नावाने सुरु झालेल्या कंपनीने या इस्त्रीची निर्मिती सुरु केली. १९१८ साली ही कंपनी ह्युजेस इलेक्ट्रिक हिटिंग या कंपनीमध्ये विलीन करण्यात आली व जनरल इलेक्ट्रिक व ह्युजेस यांनी मिळून एडिसन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस या नावाने व्यवसाय सुरु केला.

1905-B.preview

यानंतरच्या काळात इस्त्री मधे अनेक बदल होत गेले. जड लोखंडाच्या ऐवजी अ‍ॅल्युमिनियम सारख्या वजनाला हलक्या धातूंपासून सहज हाताळता येतील अशा इस्त्र्या बनवल्या गेल्या. याचबरोबर थर्मोस्टॅटच्या शोधामुळे इस्त्रीच्या तापमानावरही नियंत्रण करता येऊ लागले. इस्त्री करताना कपड्यांवर पाण्याचा शिडकावा केल्याने इस्त्री चांगली होते. याचाच विचार करुन इस्त्रीमधेच पाणी भरण्यासाठी एक पोकळी तयार करण्यात आली व इस्त्री करताना या पाण्याच्या वाफेचा फवारा कपड्यांवर उडवता येईल अशी रचना असलेल्या इस्त्र्या बनवल्या गेल्या. याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कापडांना इस्त्री करण्यासाठी वेगवेगळे तापमान ठेवण्याचीही सोय करण्यात आली. अशा अनेक वैशिष्ठ्यांच्या समावेशाने आजची आधुनिक इस्त्री बनलेली आहे.

Steam iron isolated on white background

अशा फुल्ली ऑटोमॅटिक इस्त्र्या घरोघरी विकत घेतल्या जातात तरी ही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना अगदी शेवटच्या क्षणाला आपले इस्त्रीवाल्या भैय्याच्या डोक्यावर उभं राहून कपडे इस्त्री करून आणणे काही सुटलेले नाही.

कौस्तुभ मुदगल

 

 

2 thoughts on “कपड्यांची इस्त्री

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: