कोल्होबा कोल्होबा…

पाठांतर हा सगळ्यांनाच त्रास देणारा प्रकार आहे. शाळेत असताना पाढे, संस्कृतमधील शब्दांची रुपं, कविता, रसायनशास्त्रातील मूलद्रव्यांच्या संज्ञा असं काय काय आपण पाठ करायचो आणि परीक्षेच्यावेळी पेपरमध्ये ओतायचो. त्यानंतर मात्र पुढचं पाठ मागचं सपाट.

त्याकाळी मग शिक्षक आपल्याला एखादी गोष्ट लक्षात कशी ठेवायची याच्या काही क्लुप्त्या सांगत. इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवण्यासाठी ’तानापिहिनीपाजा’ हा सगळ्यांनीच वापरलेला परवलीचा शब्द. अशा अनेक संज्ञा, व्याख्या लक्षात राहण्यासाठी त्यातील पहिले आद्याक्षर घेऊन असे शब्द बनवले की संपूर्ण पाठांतर करण्यापेक्षा तेव्हढा शब्द लक्षात ठेवला आणि तो परीक्षेच्यावेळी आठवला की उत्तर लिहिणे सोपे जाते. शाळेत असताना मीही असे अनेक ‘कोड’ शब्द बनवले होते पण त्यामुळे माझे मार्क काही गोड झाले नाहीत.

पाठांतरासाठी विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी सगळेच शिक्षक काही ना काही क्लुप्त्या करत असतात. आपल्याला इंग्रजी मुळाक्षर लक्षात ठेवण्यासाठी ABCDEFG ची एक कविता होती. ती चालीत म्हटली की आपोआप ही मुळाक्षरं लक्षात राहत.

तर असाच एक प्रयोग साधारणत: १९ व्या शतकात काही शिक्षकांनी केला. त्यांनी एक असे मजेदार वाक्य तयार केले की त्यात रोमन लिपीतील सर्व मुळाक्षरे होती. पुढे हे वाक्य इतके प्रसिध्द झाले की आज जगात असा इंग्रजी वाचू शकणारा एकही माणूस सापडणार नाही ज्याने हे वाक्य वाचले नसेल. तर ते वाक्य होते ’The quick brown fox jumps over the lazy dog’. या वाक्याचा निर्माता जरी माहिती नसला तरी या वाक्यात सर्व रोमन मुळाक्षरे येत असल्याने त्याकाळी शिक्षक नुसती A ते Z मुळाक्षरे लिहून घेण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून हे वाक्य गिरवून घेत. नुसती मुळाक्षरांची खर्डेघाशी करण्यापेक्षा हे मजेदार वाक्य लिहिणे विद्यार्थ्यांनाही नक्कीच आवडले असेल. पण विद्यार्थांना सरावासाठी निर्माण केलेले हे वाक्य पुढे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातही वापरले गेले. या अजरामर वाक्याची निर्मिती करणाऱ्या त्या अज्ञात शिक्षकांचे आभार मानले पाहिजेत.

९ फेब्रुवारी १८८५ साली बोस्टन जर्नल या वृत्तपत्रात पहिल्यांदा हे वाक्य छापले गेले. पण बोस्टन जर्नल मध्ये छापलेले वाक्य होते ‘A quick brown fox jumps over the lazy dog’. आपल्याला ’ध’ चा ’मा’ आनंदीबाईंनी केल्याची गोष्ट ठाऊक आहेच.पण इथंही ’A’ चा ‘The’ करण्यामागे एका स्त्रीचाच हात होता. Linda Bronson या बाई त्यामागे होत्या. त्याकाळी श्रीमंत लोकांकडे पत्रव्यवहार लिहिण्यासाठी लेखनिक असत. डिक्टेशन ऐकुन लिहिणे ही एक कला आहे. मग लिहिताना वेग कसा वाढेल या प्रश्नातून शॉर्टहॅण्ड ही एक वेगळी लिपी विकसित झाली. तर या Linda बाई शॉर्टहॅण्ड तज्ञ होत्या. त्यांनी १८८८ साली शॉर्टहॅण्डवर ’Illustrative Shorthand’ या नावाचे पुस्तकच प्रसिध्द केले. त्यांच्या या पुस्तकात पहिल्यांदा ’A’ ऐवजी ‘The’ चा वापर करण्यात आला. कदाचित हे वाक्य आणखी अर्थपूर्ण होण्यासाठी Linda बाईंनी असा बदल केला असावा.

१९ व्या शतकात छपाई करणार्‍या यंत्रांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग चालू होते. याचबरोबर टायपोग्राफीमध्येही मोठी क्रांती झाली. अनेक टाईप बनविणार्‍या कंपन्यांनी वेगवेगळे टाईपफेसेस ज्याला आपण आज फॉन्ट म्हणतो हे बनविणे सुरू केले. धातू ओतून हे टाईप्स बनवले जात असत. हा नवीन टाईप छापल्यावर कसा दिसतो हे आपल्या ग्राहकांना कळावे यासाठी या कंपन्या आपल्या टाईपचे कॅटलॉग बनवत. या कॅटलॉगमध्ये नुसते ABCD लिहिण्यापेक्षा मग त्यांनी ’The quick brown fox jumps over the lazy dog’ या मजेदार वाक्याचा वापर सुरू केला. मग हे वाक्य कॅपिटल आणि स्मॉल अशा दोन्ही मुळाक्षरांमध्ये लिहिलं की ग्राहकांना प्रत्येक मुळाक्षराचं वळण कसं आहे हे समजत असे. आजही आपण संगणकावर एखादा फॉन्ट इन्स्टॉल करण्यासाठी इंटरनेटवर शोध घेतला तर याच वाक्यात वेगवेगळे फॉन्टस दाखविलेले असतात.

१९ व्या शतकात टाईपरायटरचा शोध लागला आणि या शतकाच्या शेवटी शेवटी टाईपरायटरचा वापर प्रचंड वाढला. मग त्याकाळीही ’खाड खाड टाईपिंग शिका’ या सारखी पुस्तकं छापली गेली. या पुस्तकांमध्ये याच वाक्याचा उपयोग केला गेला. How to become expert in Typewriting या पुस्तकात पहिल्यांदा हे वाक्य झळकले. नंतर १८९० साली छापलेले Typewriter १८९२ साली छापले गेलेले Typewriting Instructor and Stenographers’s Handbook या पुस्तकांमध्येही सरावासाठी ह्याच वाक्याचा उपयोग करावा असे सांगितले गेले.

मॉस्को आणि वॉशिंग्टन दरम्यान टाकण्यात आलेल्या Hotline च्या चाचणीच्या वेळी ’THE QUICK BROWN FOX JUMPED OVER THE LAZY DOG’S BACK 1234567890’ असा संदेश पहिल्यांदा मास्कोला पाठवण्यात आला. मॉस्कोमधील रशियन अधिकार्‍यांनी भाषांतरकाराला तो रशियन भाषेत भाषांतरित करण्यास सांगितला. त्याने तसा तो भाषांतरित केलाही. पण तेथील कोणालाच या वाक्याचा अर्थ कळला नाही. मग भाषांतरकाराने संदेश पाठविणार्‍या अमेरिकन सहकार्‍यास त्याचा अर्थ विचारला आणि त्या अमेरिकन सहकाऱ्याने डोक्याला हात लावला.

ज्या अज्ञात शिक्षकाने हे वाक्य बनवले त्यालाही हे वाक्य इतके प्रसिध्द होईल याची कल्पना नसेल. ही झाली या चपळ कोल्ह्याची छोटीशी गोष्ट.

मला अशाच अनेक शब्दांबद्दल अजूनही कुतूहल आहे. त्यातलाच एक संगणकावर मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा ’Lorem Ipsum’ हा शब्द. आज संगणकावरील अनेक ग्राफिक सॉफ्टवेअरमध्ये टाईप सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा हा शब्द झळकतो.

Lorem Ipsum या शब्दाचा संदर्भ चक्क इ.स.पू. पहिल्या शतकातील एका रोमन तत्त्ववेत्त्यापर्यंत पोहोचतो. Marcus Tullius Cicero या नावाच्या तत्त्ववेत्त्याने इतर तज्ञ लोकांशी चर्चा करताना De finibus bonorum et malorum असा एक विचार मांडला. याचा On the end of good and evil असा अर्थ आहे. Lorem Ipsum हे या वाक्याचे भ्रष्ट लॅटीन स्वरूप आहे असे म्हणतात. या शब्दांना काहीही अर्थ नाही. वरील वाक्यातील अनेक मुळाक्षरे गाळून, बदलून आणि नवीन मुळाक्षर टाकून हा निरर्थक शब्द बनवला गेला आणि तो अतिशय प्रसिध्द झाला.

साधारणतः १९६० सालापासून हा शब्द टाईपसेटींगमध्ये वापरणे सुरु झाले. १९८० साली Aldus PageMaker या सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यांदा हा शब्द झळकला. त्यानंतर संगणकावरील अनेक वर्ड प्रोसेसर सॉफ्टवेअर्सनी हा शब्द वापरणे चालू केले. आजही Adobe ची सॉफ्टवेअर वापरणार्‍या ग्राफिक डिझायनर्सच्या हा शब्द दररोज दृष्टीस पडतो. उड्या मारणाऱ्या कोल्हयाला शेपूट म्हणून लावलेली ही आणखी एका अगम्य शब्दाची गोष्ट.

कौस्तुभ मुद्‍गल

Leave a comment

Blog at WordPress.com.

Up ↑